Saturday, January 9, 2016

एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित
श्रीधर तिळवे -नाईक 

 कविता विभाग

कवितेविषयीच्या कविता

वाळूचे कण रगडून तेल निघेल म्हणून 
रगडत राहिलो दोन हातांनी आयुष्याचे वाळवंट 
तर तेलाऐवजी बाहेर पडला 
आपल्या रक्ताचा तयार झालेला कवितेचा उंट 

त्याचे काय करायचे ते कळेना म्हणून 
आपण त्याचा घेतला मुका 
तर लोकांनी त्याच्यावर बसून 
शेळ्या हाकण्याचे काम आपल्यावर सोपवले 
आपणही इतके शहाणे कि तेही काम निष्ठेने चालवले 
तर शेळ्याही लोकांच म्हणण 
आपल्याच कानांनी ऐकू लागल्या 

शेळ्यांच दूधही आपल्याशिवाय येत नाही हे कळताच 
लोक बिथरले 
आणि त्यांनी उंटावर आरोप केला 
तंबूत घुसून अरबाला हुसकून लावल्याचा 

लोकांच्या समजुतीसाठी आपण शेवटी 
उंटावर बसून अरब शोधायला लागलो तर 
तो अरबी समुद्रावरून चालत 
थेट दुबईत गेल्याची न्यूज 
ढगांनी दिली 

आत्ता उंटावर बसून मेघदूत लिहावं 
कि वैदिक प्रार्थना आळवाव्यात 
ह्या विवंचनेत असताना 
एकाने दुष्काळाची वार्ता दिली 
आणि आपण उंटावरून मेघ हाकत 
दुष्काळी प्रदेशात आलो 

आता सर्वत्र पाऊस पडतोय म्हणून लोक आनंदित 
आणि आपण 
पावसात भिजून सर्दी झालेल्या उंटाला 
कुठल्या अनासीनला बांधाव ह्या विवंचनेत

२ 
पाण्याची वाहती जीभ बोलतिये प्रवाहाची व्यंजने
ती थोडीशी टेस्टलेस आहे

आकाशाच्या अदृश्य जीभेवर उगवतायत ढगांचे स्वर
ती थोडीशी म्याटरलेस आहे

जमिनीची अर्धी जीभ दगडी अर्धी जीभ ठिसूळ मूळ धरतीये विरामचिन्हात
ती थोडीशी फ्रूटलेस आहे

आगीला मिळालीये अष्टोप्रहर चैत्यन्याचे शव जाळणारी आणि प्रसवणारी जीभ
ती थोडीशी सेनटेन्सड पण डेथलेस आहे

आणि हवेला मिळालीये तिच्या तोंडापेक्षा लांब घोन्गावणारी जीभ
जी शब्द गोळा करून इमोशनलेस होण्याच्या प्रयत्नात आहे



मी गोठवला गेलोय ह्या सगळ्या टेन्सड जीभात
कवी झाल्यापासून
आणि भाषा
अनेक जीभांनी बोलत
तळ ठोकून बसलीये माझ्या तोंडात
जे माहीत नाही कधीपासून टंगलेस आहे




कवितेनेच निर्माण केलाय हा भेद
लिहणारा
वाचणारा
न वाचणारा

कवितेनेच निर्माण केलाय कवी
त्याचा अहंकार

कवितेनेच शिकवलीये तुलना
चांगली कविता वाईट कविता
चांगला कवी वाईट कवी

कवितेनेच निर्माण केलीये आसक्ती सृजनाची निर्माणाची
आणि आता कविताच वाट पाहतीये कवितेत
कविता नष्ट होण्याची

ही प्रतीक्षाच आहे कवितेच्या जन्माचं बीज
आणि कवितेला
ती वारंवार झाड होऊनही
हे कळत नाहीय.



कविता वाचणारे डोळे कमी होत चाललेत
कविता पहाणारे चष्मे वाढत चाललेत

कविता ही एक अशी कला होतीय
जिच्याकडे सगळेच फिरवतायत पाठ
आणि जी उलट्या पावलाने चालतीये

कदाचित काही दिवसांनी लोक तिला 'भूत' समाजतील
आणि तीही स्वतःला भूत मानून
उदासपणे पहात राहील
जिवंत माणसांनी फिरवलेली सपाट पाठ
 आणि त्या पाठीचा हरवलेला कणा
फक्त तिच्याच डोळ्यांना दिसणारा




जीमी ( मोहिंदर अमरनाथ )साठी एक कविता

जा
आणि पुन्हा ये

लख्ख तांबुस सावळ्यातील भुरे डोळे
सहनशील करून
टाक मैदानात तुझे जिद्दी पाय
कप्तानशीपची क्याप तुझ्या आफ्रिकन डोक्यासाठी नाही
पण तुझां मेंदू शीपसारखा नांगरून ठेव
विकेटच्या बंदरात
ना सुनीली स्कील ना कपीली तेज
तुझी रणझुंजारी मेख
कायम ग्यानबाचीच राहील
वेगाने शेकलास
बम्परने माखलास
हूकमध्ये फेकलास
तरी पेशन्स ठेवून हाताळत रहा ब्याटमधला धीमा वारा
तुझी ब्याट माझ्या कवितेसारखी आहे
जी मैदानात येते
वारंवार घरी बसवूनही

जा
आणि पुन्हा ये

मला माहीत आहे
तुझा परतण्याचा वेग
त्यांच्या हाकलण्याच्या वेगापेक्षा अधिक आहे.

ये




मी कागदावर लिहिलं
'आंबा'
सारा कागद पिकून
आंब्यासारखा पिवळा झाला

मी आमराईत बसून कागद वाचला
हळूहळू आमराईतील साऱ्या आंब्यांना
सालीऐवजी कविता आल्या

कवितांनी आंब्याबरोबर
बाजारापर्यंत प्रवास केला
आणि शेवटी ज्यांनी आंबे खरेदी केले
त्यांच्या फ्रीजमध्ये
कायमच्या फ्रीज झाल्या



मी कवितेच्या सहाय्याने आयुष्यावर विजय मीळवण्याचा प्रयत्न केला
आणि पराभूत झालो
माझा पराभव अक्षर झाला

मी वाकलो वाकलो नाही कधीच व्याकराणाने
भाषा मोळताना थोडा व्याकूळ झालो

निरोप घेताना मी आसवे गाळण्याची वाट पाहणाऱ्यानो
कवी रडतात तेव्हा अश्रू येत  नाहीत
डोळे वाहून जातात

डोळे : युगाची सद्दसद्दविवेकबुद्धी
आणि तिला झालेली जखम



कविता कागदाला जिवंत करते
मग त्यालाही तो सजीव असल्याचा फील येतो
कालांतराने वाढत जातो वयाचा पिवळटपणा त्याचा अंगारवाघावर
चढत जातो तो कवितेत मारण्याच्या पायऱ्या
हळूहळू त्याला नाहीसे होण्याचे भय जडते
आणि तो पुनर्जन्माचा शोध लावतो

त्याचे रिसायकलींग होत राहते
आणि त्याला कायमचा विसर पडतो
तो कवितेतून नव्हे
तर झाडातून आलाय ह्या सत्याचा

प्रत्येक जन्मात कागद प्रतीक्षा करतो कवितेची
आणि कविता कागदामागे असलेले झाड शोधत
कागदावर पक्ष्यासारखी उतरत राहते.



हल्ली कवी कविता लिहीतच नाहीयेत

माणसंच लिहितायत
जी
दुधात पाणी मीसळायला
वजनात काटा मारायला
प्रमोशनसाठी पाठ वाकवायला
पैसे देऊन मार्क्स वाढवायला
बॉसच्या बायकोचे कपडे धूवायला
टेबलाखालून पैसे घायला द्यायला
मीनिटामीनीटाला सोयीस्कर खोटे बोलायला
तलवारीन  जमलं नाही तर जीभेन माणसं  मारायला
स्वत : चं आळसाचं  शेत  अल्पमजूरीवर  नांगरून घ्यायला
हाताखालील लोकांवर रुबाब डाफरायला

लाजत नाहीत

कविता त्यामुळेच माणसासारखी दिसायला लागलीये
जमिनीत अडकलेली
आकाशाला अफवा समजणारी

माणसं कविता लिहितायत
आणि कवी गायब आहेत

१०

तुझी प्रसिद्धी तुझ्या हयातीत तुला पाहायला मिळणार नाही
म्हणून सिद्धीतच समाधान मान

मान मोडून कविता लिही
आणि काळ कधी तुझी मान मुरगाळतोय ह्याची वाट पहात
भाषेच्या खुर्चीत बसून रहा

ह्या खुर्चीने कैक कवी पचवले
तूही तिचे अन्न हो

बघ
मुंग्या वास घेत तुझ्याच दिशेने येतायत .






११
ज्यांना अभिनय करायचा होता त्यांनी अभिनय केला चेहऱ्यांचा
 ज्यांना सत्ता हवी होती त्यांनी निवडणूका हाताळल्या मुखवट्यान्च्या
. ज्यांना पैसे कमवायचे होते त्यांनी एकमेकांना माणसे विकली

मी मात्र फक्त लिहीतच राहिलो
कुणीही वाचणार नाही अश्या कविता
आणि पहात राहिलो वाळूच्या डोळ्यांनी
खोलीच्या  वाळवंटातील पुस्तके
जी कुणी वाचायलाही क्वचितच उचलली

मी कवी असण्याविषयी कधीच तक्रार केली नाही
फक्त उपेक्षेच्या डोंगरात
अपेक्षांचे उंदीर जमा होऊ नयेत म्हणून
माझ्या दोन्ही डोळ्यात
असंख्य मांजरे पाळली
आणि कविता लिहिताना
वाचक मिळण्याची तृष्णा निर्माण होऊ नये म्हणून
स्वतःचे दोन्ही कान
कायमचे छाटून
स्वतःचा पहिला वाचक
कायमचा गमावला

आता मी फक्त अनपेक्षित लिहितोच आहे
स्वतःलाही कानोकान खबर होऊ देता


१२
मी
पुस्तक वाचतोय
माणूस वाचतोय
जग वाचतोय

माणूस मला वाचतोय
जग मला वाचतय

फक्त पुस्तकच असं आहे
जे मला वाचू शकत नाही

कदाचित ते सेन्सलेस आहे


१२
बोलणं
हे स्वतःशी बोलणंच असते

इंटरअक्शन
एकमेकात नंतर
आंत प्रथम असते

पॉज
शेवटचा उमलाव असतो

आणि मौन
सर्वात शेवटचा शब्द


१३
कुजबुज कुजबुज    कुणी चालवली
भाषा अवघी          जिने मालवली
जिची लायकी         चवली पावली
जिच्यात लक्ष        ब्रम्हांडे सामावली

कुणी इन्वेन्टली        कुणी इनोवेटली
कुजबुज कुजबुज     एक्सप्लोड होऊन
जी ना थरथरली

कुजबुज कुजबुज
भाषेत मरून      जी तरली
अभंगात मरून     जी तरंगली

ज्यांच्यात झाली    समधर्मी झाले
ज्यांनी शोधली       समकर्मी झाले
जेव्हा मेले          
                           तिला घेऊन मेले

कुजबुज कुजबुज


१४
जेव्हा सगळे झिरो असतात
तेव्हा सगळेच झिरो असतात

हा एवढा प्रचंड एकांत
एकटा आहे
त्याला स्वतःचे पोट फाडूनच
एकीकरण घालवावं लागेल

ही डायमेंशनल जादू चालवत
कोण वल्हवतय माझ रक्त
गायब हातांनी
माझ्या हृदयांच्या  समकालीन पिढ्यात

मी माझा मेंदू
भाषेत रेकॉर्ड करतोय
मात्र रेकॉर्डिंग नीट होतय कि नाही
ह्याबाबत साशंकता आहे
तेव्हा ही कविता संशयास्पद वस्तू म्हणून वाचावी
खात्री पटल्यास
त्या खात्रीची जबाबदारी
माझी नाही


१५
टीकाकारांसाठी
कळणारच नाही टीकाकारांनो
माझ्या कवितेचा झगमग पुरावा
'अस'की प्रभाचा अचम्बीत उडावा

माणसांच्या ढीगात मी माणुसकी
रखरखीत भगभगीत उकाड्याची टिचकी

आवाजाची नम्रता भाषेचा शहामृग शहजोगातून काढणारी
शब्दांना माझ्या रोज येते अक्कलवाढ गाढ वाटणारी

तरतरीत मरणाची मासूम होम डीलवरी
आणि कवितेची धारदार वैखरी

कळणारच नाही टीकाकारानो
नुसतेच फुगलेल्या आकारांनो

उडत उडत जा भू भू छू छू टपूक झुक
जा जा
नका येऊ माझ्या वाट्याला
नका जाऊ माझ्या वाटेला
स्पर्श सुद्धा होणार नाही तुमचा माझ्या ताठ्याला
जो डम्पिंगमध्ये असून एकदम कडक
नका येऊ तडक

जा जा                           भडक
शतकांचा प्रवास घ्या                                                 आणि
ह्या      -      माझ्या        -         कवितेतील         -  
त्या क्षणांचा अदमास
जे गटसी होते

१६
जन्मभर जळत होतास
स्वतःलाही कळत होतास
फुले हाती  लागली नाहीत
फळलास ते उधळत होतास

त्याचा आत वास नाही
वासापुरताही  शिल्लक नाहीस
फक्त कागद कागदाची भिंत
तिच्यावरचे भ्रमिष्ट रवन्थ

पोरा पोरा कविता कुठे आहे
गुरुजी गुरुजी ती कागदाने खाल्ली
पोरा पोरा कागद कुठे आहे
गुरुजी गुरुजी त्याची भिंत झाली

पोरांनो प्रश्न पत्रिका भिंतीच्या नसतात
कागदाच्या असतात
तेव्हा मनमोहन - ऑप्शनला टाका

१७

कविता लिहितोय
तर्कशास्त्र गायब होतंय

चित्रे काढतोय
तत्वज्ञानाची खैर नाही

शब्द भाषेतून येतायत
पण त्यांचामागे भाषा नाही

त्यांचा मार्फत काय येतय
काय जातय

मी सेकंदासेकंदाने अडाणी होत चाललोय



१८
सुरवातीचा शेवट झाला
कळलाच नाही
शेवटाची सुरवात
माहित नाही

मध्यात
मदय  आणि गद्य

कविता दोन्ही पिऊन
कल्पनेच्या बारमध्ये  नाचतीये

भाषा चकना पोहचवतिये


१९
क्रीयेटीवीटी हीच माझी आयडेयंटी
कॉपीक्याट मधला सी कितीही आकर्षक असला तरी
मी त्याला माझा स्क्रिप्टमध्ये जागा देत नाही

मला निर्मितीत विश्व बँग झाल्याचे आवाज लागतात
मग तिचा प्लॅनेट   होता
फक्त डेब्रीस झाले तरी मला चालते

माझा उद्देश सूर्यमाला तयार करण्याचा नाही
माझ्या निर्मितीत पृथ्वी जगावी
एवढीच बाळबोध अपेक्षा माझी  आहे

म्हणून तर मी सारख्याच इज्जतीने उभे करतो
ताजमहल आणि दलदल

२० चिन्हे


 प्रश्नचिन्हे  स्वतःहून गायब होतायत  भाषेतून
त्यांचे म्हणणे असे कि
सगळेच प्रश्रांकित झाल्यावर
आणि वाक्यातील प्रत्येक शब्दापुढे
आम्ही अद्रुश्यपणे उभे रहात असल्यावर
आम्हाला दृश्यपणे टाकण्याची गरज ते काय ?

उद्गारचिन्हे पाठ फिरवतायत भाषेकडे
त्यांचे म्हणणे  असे कि
लोकांना आता कशाचेच आश्चर्य वाटत नाही
आणि जेन्यूईन उद्गार ही फक्त कल्पनाच आहे
सध्याच्या भावनाशुन्य जगात

अर्धविराम स्वल्पविराम वगैरे तर
आत्महत्या करू लागलेत
आयुष्याचा आणि वाक्यांचा वेगच इतका वाढलाय कि
कुणालाही कसलाही विराम घ्यायचा नाहीये

फक्त एक पूर्ण विरामच आहे
जो अजूनही संपूर्ण भाषाभर टिकून आहे
त्याचे म्हणणे इतकेच
कि सगळ्या चिन्हांना स्वतःत विलीन करत
तो शेवटी सगळी भाषा गिळणार आहे

मला माहीत आहे
तो माझी वाट  पाहतोय
आणि मी मौन पळून
भाषेबाहेर जिवंत आहे


२१अद्ययावतींग 

दुसऱ्याच जिभेनं मी पहिली भाषा बोलतोय
तर लोकांना वाटतंय
मी पहिल्याच जिभेनं बोलतोय

शब्द गंध सोडतात
प्राचीन आणि अर्वाचीन
मी फक्त त्यांना अद्ययावत  करतोय

मी उत्क्रांतिचे '' मिसिंग'' उत्क्रांत करत नाहीये
मी एक ''मिसिंग उत्क्रांति '' स्वतःत सामावून घेतोय
आणि ती स्वतःतून भाषेत डेवलप करतोय

माझ्या अंगाईगीतांनी सिंह झोपी जातात
माझ्या अजानने माणसे डरकाळ्या फोडत जागी होतात

इच्छांचा  हैंगओवर  होणाऱ्यांपैकी मी नाही
मी आजची दारू आज पितो
आणि आज पचवतो

मला नियंत्रित करण्याची ताकद माझ्यातच नाहीये
तर
तुमच्या ह्या घरगुती पंख्यांनी
माझ्यातील वादळे काय रिप्लेस होणार?


२२ शिव्या
बुल काय
अन शिट काय
शेवटी एकाच बुलशिटचे अवयव

मदर काय
अन फ़कर काय
शेवटी एकाच मदरफ़करचे अविष्कार

शिव्या ब्रीलीयंट असतात
आणि देणाऱ्याकडे कविता लिहिण्याचे स्किल नसल्याने
तो शिव्या देतो

तेव्हा  माणूस शिव्या देत असेल
तर नीट ऐक
कदाचित त्याच्यातील कवी बोलत असेल.


२३ कवितास्वेटर 

घटना मला लिहितायत
आणि मी त्या
कवितेत ओततोय
                            असं नाही की
                            मला थंडी वाजत नाही
                            पण मी
                            कवितेत उबच उतरवतोय
कविता हे मी भाषेतून पुरवलेलं स्वेटर आहे


एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित 



   श्रीधर तिळवे -नाईक 
(एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या काव्यफाइलीतून )















बलात्कार केलेल्या बयेस उद्देशून एक कविता  - श्रीधर तिळवे - नाईक 
इतिहास खरा नाही 
मी मग का मागे जाऊ ?

कल्पना ताणवली म्हणून थोडीच वास्तव होते ?

आभास होण्याचे कोवळे वय 
तूच तर संपुष्टात आणलेस 
स्त्रैण क्रौर्याने 

तू बलात्कार केले नसतेस 
तर मी पुरेसा जखमी झालो नसतो 

तू तुझी  आग विझवलीस 
आणि मी अंतर्बाह्य राख झालो 

कोळश्यावर चर्चा करून 
वय जिवंत होणार आहे का ?

बाईचा बलात्कार सामाजिक नसतो 
तर तुला क्यारक्टर सर्टिफिकेट देणारा मी कोण ?

तू मला नासवलेस 
पण मी पनीर झालो 

जा
गिल्टच्या दुधाची बासुंदी होत नाही 
ते फक्त नासत राहत 

तेव्हा त्यातून मुक्त हो 

हे दुग्धाळ बये 
माझे दुधाचे दात 
थेट अक्कलदाढ बनले 
हा तू घडवलेला चमत्कार नाही का ?

मी तुझे बलात्कारही पॉझीटीवली घेतले 

मी इतका पॉझीटीव आहे कि 
तुझ्याबरोबर रोमान्स करू शकतो 

ही मैच्युरिटी नाही 

ही सविकल्प समाधी आहे 

जा 
तू माझ्या आत्म्यापर्यंत पोहचली नाहीस 
हे बलात्काराचे सौजन्य नाही 
ती बलात्काराची मर्यादा आहे 

जा 

श्रीधर तिळवे -नाईक 

 (एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या काव्यफाइलीतून )

इश्य श्रीधर तिळवे -नाईक 
तिच्या ''इश्य '' मध्ये काहीही अर्थवर्धक असू शकतं-
लाजेनं घेतलेला पॉज 
किंवा "मी तुम्ही अप्रोच झालाच तर निर्लज्ज व्हायला तैयार आहे" ह्याचा संकेत
किंवा नात्यासाठी घेतलेला  डेवलपमेंटल पॉज 
किंवा पुरुष खाण्यापुर्वीचा ढेकर 
किंवा नाजूक टोनची फैट फैन्टसी
किंवा थांबण्याचा गडबडीत केलेला इशारा 
किंवा आमंत्रणाची मुलायम कबुली 

 'इश्य '' काय  आहे 
ते कळणार नाही तुला  कधीच 


श्रीधरा , 
 ही आदिम रहस्याची रिलेशनल सुरवात आहे

 श्रीधर तिळवे -नाईक 

 (एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या काव्यफाइलीतून )

तैयारी - श्रीधर तिळवे -नाईक 


येताना कविता बनून येणार नसशिल 
तर निदान कविता लिहिण्यासाठी कागद आण 

ऋतू रॅपर्समध्ये गुंडाळता येत नाहीत 
पण काही क्षण निश्चितच फुलासारखे उमलव 

मी घर फर्निचरने भरावे कि पुस्तकांनी 
ह्याविषयी संभ्रमात  आहे 
पण लिखाणासाठी एक पेन 
अफोर्डेबल आहे 

कंडोमने नेमके काय निमंत्रित होते 
हे मला अध्याप कळालेलं नाही 
त्यामुळे तो मीच आणेन 

मूड मात्र बाजारात विकत मिळत नाही 
त्यामुळे तो तुला तुझा 
मला माझा 
आणावा लागेल 

मी transformer तयार ठेवलाय 
तू येऊन वीज शिलगाव 

 श्रीधर तिळवे -नाईक 

 (एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या काव्यफाइलीतून )

नमस्कार - श्रीधर तिळवे -नाईक 

कपाळ नतमस्तक झालंय 
आणि मला माहित आहे 
तिचा जीव काळजात आहे 
 श्रीधर तिळवे -नाईक 

 (एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या काव्यफाइलीतून )
 च्युइंगमश्रीधर तिळवे -नाईक 

माझ्या तोन्डात काळजाचे  च्युइंगम चघळत 
मी करेन तुला प्रपोज 

तुझ्या स्वच्छ क्रिस्टल क्लियर डोळ्यात 
मी मारेन माझ्या शब्दांचा खडा 
आणि फुटलाच बुबुळाचा घडा 
तर गोळा करेन तुझ्या आसवांचे ओघळलेले दही 
फुटलेल्या नजरेच्या खापऱ्या 

हो म्हणालीस तर तुझ्या चेहऱ्यावर उगवलेलं लाजेच गवत 
गवती चहा करत पिऊन टाकेन ओठांनी 
नाही म्हणालीस तर  गिळून टाकेन होऊन गमगीन 
बेचव  च्युइंगमचे शेवटचे शव  

आणि इनकेस काहीच नाही म्हणालीस तर 
चघळत राहीन उद्यापर्यंत 

हे काळजाचे  च्युइंगम
आणि  चघळणारा  हा काळाचा जबडा 

श्रीधर तिळवे -नाईक 

 (एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या 
काव्यफाइलीतून )
हिरोशिमा श्रीधर तिळवे -नाईक 

अणुबॉम्बच्या टापा ऐकत ऐकत 
जन्मलोय ह्या कोल्हापूर शहरात 
जिथे घोडे लावले जातात 
धावले जातात 

हिरोशिमा दिसतंय मला दिवसा 
अणुबॉम्बच्या पलीकडे 
उगवलेल्या सूर्यासारखे तपस्वी 
आणि रात्री 
स्वत:च्या घड्याळात चंद्र चमकवत 
पोर्णिमा घडवणार 

काय पहायचं हे अवलंबून असत 
तुमच्या डोळ्यातील चिमुटभर प्रकाश -अंधारावर 
राख पकडायची कि पुनर्निर्माण ?
फुले हुंगायची कि मृत्यू ?

जे होऊन गेले ते होऊन गेले 

माफीनामे मरून गेले 


   श्रीधर तिळवे -नाईक 
(एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार अप्रकाशित ह्या काव्यफाइलीतून )


कविता मरणार आहे
म्हणजे मी जी मरणार आहे
तिच्या गर्भात आहे

मराठी भाषा मरणार आहे
म्हणजे माझी आई जिच्या गर्भाशयात आहे
तीही नाहीशी होणार आहे

तरीही मी मराठी भाषेत
कविता लिहितोय

माझा हात वात्यांनी बनलेला आहे

***************************


















No comments:

Post a Comment